पुणे – महापालिकेकडून शहरात दिवाळीसाठी फटाके विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यात, प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वर्तक उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्राच्या कडेच्या स्टॉलला सर्वाधिक मागणी असते. मात्र, या स्टॉलवरून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात वाद झाल्याने महापालिकेने यंदा पहिल्यांदाच स्टॉलसाठी ऑनलाइन लिलाव घेतला होता. यात पालिकेला तब्बल आठ पट अधिक भाडे मिळाले आहे. 21 स्टॉलचे 39 लाख रुपये मिळाले आहे.
महापालिकेकडून या ठिकाणी 35 गाळे उपलब्ध करून देण्यात आले असून प्रत्येक गाळ्यासाठी दहा दिवसांसाठी 25 हजार भाडे निश्चित केले होते. या लिलावात पहिल्या दिवशी अवघ्या 21 गाळ्यांच्या लिलावातून पालिकेस 39 लाख रुपयांचे भाडे मिळाले आहे. हे भाडे सरासरी 1 लाख 80 हजार ते 2 लाखांपर्यंत मिळाले असून उर्वरित 14 गाळ्यांसाठीही सुमारे 35 लाखांचा महसूल मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. मागील वर्षी याच ठिकाणच्या गाळ्यातून महापालिकेस अवघे 14 लाख 66 हजार रुपयांचे भाडे मिळाले होते. दरम्यान पालिकेकडून या वर्षी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 165 गाळे त्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
“वर्तक बाग येथील गाळ्यांच्या लिलावातून गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या रकमांची बोली लावण्यात आली आहे. 15 गाळ्यांमधून 26 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. उर्वरित गाळ्यांचा लिलाव सुरू आहे. तसेच शहरातील इतर ठिकाणीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका