फलटण – फलटणला संस्थान काळापासून खो खोची जी परंपरा आहे. राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी येथे आलेल्या सर्वच खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्यासमवेत आलेल्या सर्वांचे आभार मानत फलटणला होणाऱ्या सामन्यात कधीही कमतरता पडली नाही व आगामी काळात पडणार नाही, असे विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय खो- खो स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभात रामराजे बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री व आ. बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, राज्य क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव चंद्रजीत जाधव, राज्य खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा मॅच्युअर खो- खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
खेळाडूंसह इतर सर्वच टीम मेंबरची राहण्याची व भोजनाची सोय उत्कृष्ट होती. भविष्यात कोणतीही स्पर्धा असेल तर त्यामध्ये फलटणकर मागे राहणार नाहीत, असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. फलटणसारख्या शहरात पाचव्यांदा खो- खोचे राष्ट्रीय सामने भरवले जात आहेत. त्यावरूनच फलटण व खो- खो हे वेगळे समीकरण दिसून येत आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही खो- खो, कुस्तीचा नवा आराखडा तयार करत आहे. या आराखड्यात या खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र क्रीडा महासंचनालयाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.
फलटणला झालेले सामने खेळाडू कधीही विसरणार नाही. फलटणचे उत्तम नियोजन आयोजनकर्त्यांचे यश आहे, असे मत महासचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा नियोजनबध्द पद्धतीने पार पडली. कोणत्याही व्यवस्थेमध्ये कमतरता फलटणला कोणालाही जाणवली नाही, असे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय खो- खो स्पर्धेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले. फलटणला खो- खोचे अनेक खेळाडू लाभले आहेत. फलटण व खो- खो हे एक समीकरण तयार झाले आहे. फलटणसह जिल्हा व राज्य स्तरातील सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मोठे सहकार्य केले आहे, त्यांचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात विशेष आभार व्यक्त केले. सचिव ऍड. गोविंद शर्मा यांनी आभार मानले.