लोकच आता मोदींचा राजीनामा मागतील – संजय राऊत यांचा दावा

मुंबई – करोनाच्या काळातील लॉकडाऊन मुळे देशातील तब्बल 10 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्याचा चाळीस कोटी कुटुंबियांना फटका बसला आहे, यावर मोदी सरकारने गांभीर्याने उपाययोजना केली नाही तर लोकच आता पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागतील असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील कॉलम मध्ये लिहीलेल्या लेखात त्यांनी हा आरोप केला आहे.

ते म्हणाले की अनेक नोकरदार मध्यमवर्गाने आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाहीं मोठा फटका बसला आहे. या साऱ्या प्रकारात देशाचे तब्बल चार लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. लोक सहन तरी किती करणार हा प्रश्‍न आहे.

लोकांच्या सहनशक्तीला मर्यादा असतात. केवळ आशा आणि आश्‍वासनांवर ते जगू शकत नाहीत. आता रामाचा वनवास संपला असला तरी लोकांसाठी मात्र सध्याची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. 

लोकांना यापुर्वी कधीच इतके असुरक्षित वाटले नव्हते तितके आता लोक असुरक्षित समजायला लागले आहेत असे ते म्हणाले. अशाच परिस्थितीमुळे इस्त्रायल मध्ये तेथील पंतप्रधानांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. त्यांचा राजीमाना मागितला जात आहे. भारतातहीं अशीच परिस्थिती उद्‌भवू शकते असा इशाराहीं त्यांनी दिला आहे. 

करोना हाताळण्यात आणि आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा पाढा त्यांनी यात वाचला आहे. अंबाल्यात दाखल झालेल्या पाच राफेल विमानांच्या रक्षणासाठी तेथे जमावबंदीचे कलम पुकारावे लागले आहे असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की देशात या आधी सुखोई आणि मिग विमाने आणली गेली पण त्यावेळी अशा प्रकारचे सेलिब्रेशन कधीच झाले नाही. 

राफेल विमानातील बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांमुळे देशातील बेरोजगाराची समस्या आणि आर्थिक संकट संपणार आहे काय असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकार मात्र विरोधकांची सरकारे पाडण्याचे राजकारण करण्यात व्यस्त आहे असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.