पुणे – करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले असले तरी त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.या अत्यावश्यक सेवांमध्ये स्थानिक दवाखान्यांचा समावेश असला तरी उपनगरातील हे स्थानिक दवाखाने अनेक ठिकाणी बंद असल्याचे आढळून येत आहे.त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
नागरिकाला कुठलाही छोटा-मोठा आजार झाला तरी तो प्रथम स्थानिक दवाखान्यात जातो.तेथील डॉक्टराकडून तपासणी करून मग शंका आली तर मात्र मोठ्या हॉस्पिटल मध्ये किंवा इतर उपचार सुरू होतो.त्यामुळे आजारी पडल्यावर पहिला जवळचा असतो तो स्थानिक दवाखान्यातील डॉक्टर पण करोनाच्या पार्श्वभूमीवर भितीपोटी या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहे.एखाद्या परिसरात जर चार ते पाच दवाखाने असतील तर त्यातील एखादाच सुरू असतो.नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे.
यासंदर्भात डॉक्टर नितीन बोरा यांच्याशी संवाद साधला असला ते म्हणाले, माझे स्वत;चे पद्मावती येथे क्लिनिक आहे.मी सध्या ते सुरू ठेवले आहे पण करोनाच्या संसर्गामुळे एखादा रूग्ण आमच्याकडे आला तर त्याला तपासण्यासाठी आमच्याकडे कुठलेही आवश्यक ते कुठलेही सुरक्षा किट नाही. त्यामुळे खरी अडचण होत आहे.करोनाचा रूग्ण तातडीने ओळखणे सुद्धा अवघड आहे.यामुळेच घाबरून उगीच त्रास नको म्हणून डॉक्टर दवाखाने बंद ठेवत आहेत.
यावर उपाय म्हणून शहरात आणि उपनगरात जेवढे खासगी दवाखाने आहेत त्यांना तपासणीसाठी आवश्यक असणारे किट उपलब्ध करून द्यावे म्हणजे त्यांना तपासणे सोपे जाईल त्याचबरोबर पालिकेचे उपनगरात सगळीकडे रूग्णालये आहेत.या रूग्णलयांमध्ये सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्याठिकाणी स्वतंत्र एक विभाग सुूरू करावा म्हणजे जर आमच्याकडे एखादा संशयित रूग्ण आला तर त्याला आम्ही या पालिकेच्या रूग्णालयात तपासू शकू जेणे करून तपासणे सोपे होईल.
करोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे किरकोळ आजारासाठी दवाखान्यात येऊ नये याशिवाय दवाखान्यात पाच ते दहा मिनिटांच्यावर जास्त थांबू नये.जर एखाद्या दवाखान्यात गर्दी असेल तर रूग्णांनी शक्यतो नंतर येणे पसंत करावे, जर मोबाईल डॉक्टरांशी संवाद साधून औषधे घेता येत असतील तर रूग्णांनी हा पर्याय निवडवावा असे आवाहन सुद्धा बोरा यांनी केले आहे.