नवी दिल्ली – दिल्लीत केजरीवाल सरकारने रोजंदारी बुडालेल्या बांधकाम क्षेत्रातील मजुरांना मदतीचा हात देत त्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला असून त्यांनी दिल्लीकर 72 लाख कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतके रेशन मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी नायब राज्यपालांबरोबर बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही माहिती दिली. लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनाही सरकारी ओळखपत्रे जारी केली जातील, असे त्यांनी नमूद केले आहे. अपंग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी पेन्शन या काळात दुप्पट करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. नाईट शेल्टरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत जेवण देण्याचीही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे.