हडपसर (विवेकानंद काटमोरे) – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवारांनी गेल्या काही दिवसात मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यानंतर आज शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या. परंतु मावळ किंवा पुणे लोकसभेत घेतलेल्या भेटीगाठीचा दौरा नियोजनाने झाल्याचे दिसून येत नाही.
याउलट हडपसर विधानसभा मतदारसंघात झालेला आजचा भेटीगाठीचा दौरा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिरूर लोकसभेसाठी जनसंपर्काचा श्री गणेशा केला असून शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार लढण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष संघटन वाढीसाठी या भेटीगाठी असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो आहे.
गेल्या काही दिवसांत मावळ आणि पुणे लोकसभेची चाचपणी करून आता शिरूर लोकसभेची चाचपणी केली जात असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी पुन्हा निवडून येण्याचे खुले चॅलेंज देत शिरूर मधून आपला उमेदवार विजयी करण्याचा केलेला पण लक्षात घेऊनच की काय आज पार्थ पवार हडपसर विधानसभा मतदारसंघात दाखल झाल्याचे पहायला मिळाले. त्यांचा आजचा दौरा तसा नियोजित होता.
सकाळी नऊ वाजता ते मुंढवा येथे माजी नगरसेवक बंडूतात्या गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याची वेळ मतदारसंघात केलेल्या वेळापत्रकात होती. परंतु पार्थ पवार सकाळी वेळेच्या आधी पंधरा मिनिटे म्हणजे पावणे नऊ वाजताच गायकवाड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा बापसे बेटा सवाई असे शब्द उपस्थितांच्यामधून आपसूकच निघाले.
आल्यानंतर स्वागत आणि हलका नास्ता घेवून भेटीगाठीच्या या दौऱ्याला सुरवात झाली. पुढे माजी नगरसेविका सुरेखा कवडे यांच्या निवासस्थानी (बी.टी. कॅवडे रोड) ,माजी नगरसेवक आण्णा म्हस्के यांच्या निवासस्थानी (भीमनगर),माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्या निवासस्थानी (१५ नंबर सोलापूर रोड कॅनोल जवळ),माजी महापौर वैशाली बनकर यांच्या निवासस्थानी (सातववाडी), माजी नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालय (ससाणेनगर), माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालय (रामटेकडी), माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांच्या निवासस्थानी (सय्यदनगर), येथे तर शेवटी दुपारी पावणे तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष संदीप बधे यांच्या निवासस्थानी( कोंढवा) जाऊन भेटीगाठी घेण्याचा दौरा संपला.
खुद्द अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदार संघावर नजर ठेवून येथील विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळालेल्या यशावर संबंधित क्षेत्राच्या विधानसभा व त्यापुढील सर्वच निवडणुकांचे तिकीट पक्की होणार आहे. त्यामुळे सर्वच पदाधिकारी कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
पार्थ पवारांनी आज हडपसर मधील माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यावेळी मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शहराच्या महिला कार्याध्यक्षा पूनम पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर चांदेरे, मतदार संघाचे अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, महिला अध्यक्ष वैष्णवी सातव आदिंसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक भेटीच्या ठिकाणी उपस्थित होते.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते म्हणून पार्थ पवार यांच्याकडे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठीच ते पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांना भेटून विकास कामे व इतरही अडीअडचणी जाणून घेत आहेत.त्यांच्या या भेटीगाठीतुन पदाधिकारी व कार्त्याकर्त्यांना बळ मिळत आहे. त्यामुळे केवळ पक्ष संघटनात्मक या भेटीगाठी होत्या. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक संदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा आज दिवसभरात कोठेही करण्यात आली नाही.”
– डॉ.शंतनू जगदाळे , अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हडपसर विधानसभा.