भारताचे नेतृत्व करण्याची पंतकडे क्षमता – अझर

मुंबई – ऋषभ पंतकडे केवळ दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून पाहिले जाऊ नये, त्याच्याकडे भारतीय संघाचेही नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असा विश्‍वास माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन याने व्यक्‍त केला आहे.

पंतची फलंदाजीची शैली आक्रमक आहे तसेच त्याचा स्वभावही आक्रमक आहे. तो एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आता सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याच्याकडे आता एक जबाबदार खेळाडू म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे. श्रेयस अय्यर जायबंदी झाल्यामुळे पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याला केवळ आयपीएलच्या एका संघाचे कर्णधार जरी बनवण्यात आले असले तरीही त्याची क्षमता इतकी आहे की, तो भविष्यात भारतीय संघाचेही नेतृत्व करू शकतो, असेही अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.

पंतने स्वत:ला सिद्ध केले आहे. आयपीएलसह पुढील मोसमातील होणारे सर्व सामने पंतसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध त्याने केलेली कामगिरी त्याच्यावरची जबाबदारी आणखी वाढवणारी ठरणार आहे. नेतृत्वाचे दडपण नसताना त्याची फलंदाजी कशी असते ते आपण पाहिले आहे, आता संघाचे नेतृत्व करताना तो आयपीएल स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचा दौरा तसेच मायदेशात झालेली इंग्लंडविरुद्धची मालिका पंतसाठी सर्वोत्तम ठरली. त्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारात त्याने सातत्याने सरस कामगिरी केली आहे. आता त्याच्याकडे दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व सोपवण्यात आल्यामुळे आयपीएल स्पर्धेतही त्याची कामगिरी निश्‍चितच सरस होईल. मात्र, त्याची खरी परीक्षा यंदाच्या मोसमात होत असलेल्या मोठ्या स्पर्धांमध्येच होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय क्रिकेट संघाची निवड समिती भविष्यात त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्‍त केल्यास मला आश्‍चर्य वाटणार नाही. त्याच्याकडे कर्णधारपद सांभाळण्याची क्षमता आहे. त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता त्याच्या नेतृत्वातही दिसून येईल व त्याचा भारतीय संघालाही लाभ होईल, असेही अझरुद्दीन यांनी म्हटले आहे.

नेतृत्वाचा अनुभवही आहे

पंतने दिल्ली संघाचे मानाच्या रणजी करंडक स्पर्धेत चार वर्षांपूर्वी नेतृत्व केले होते. त्यावेळी दिल्ली संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे संघाचे नेतृत्व कसे करायचे याचाही त्याला अनुभव आहे. आता आयपीएल स्पर्धेत तो कसे नेतृत्व करतो हे त्याच्यासह निवड समितीसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्याच्या वैयक्‍तिक कामगिरीवरही लक्ष राहील, असेही अझरुद्दीन यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.