पंतला नेतृत्वाचाही अनुभव मिळेल – रिकी पॉंटिंग

नवी दिल्ली  – दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी ऋषभ पंतच्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरेल. तसेच नेतृत्वाच्या अनुभवाच्या जोरावर तो येत्या काळात जास्त सक्षम बनेल, असे मत संघाचे प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी व्यक्‍त केले.

नियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. पंतच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत होती. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये पंतने दमदार कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद केली. त्यामुळे आता नेतृत्वपदाचा अनुभव पंतसाठी अधिक लाभदायक ठरेल, असे पॉंटिंग म्हणाला.

श्रेयसची उणीव निश्‍चितच जाणवेल. पंतसाठी स्वत:ला सिद्ध करण्याचीही मोठी संधी आहे. त्याच्या क्षमतेविषयी मला कधीच शंका नव्हती. उलट या दोन मालिकांमधील त्याच्या कामगिरीमुळे पंतचा उंचावलेला आत्मविश्‍वास आयपीएल स्पर्धेत दिल्ली संघासाठी लाभदायक सिद्ध होईल, असे पॉंटिंग म्हणाला.

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन मालिका पंतच्या कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. तो आता जास्त प्रगल्भ झाला आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन संघांविरुद्ध भारताने मिळवलेल्या यशात पंतचा वाटाही मोठा होता. त्यामुळे पंतला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. आता याचाच फायदा दिल्ली संघाला आयपीएल स्पर्धेत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.