बाहेरील व्यक्‍तींना पुणे विद्यापीठात “नो एन्ट्री’

करोना उपाययोजनांतर्गत प्रशासनाच्या सूचना; ई-मेल अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन

 

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना पाठवू नये. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वगळता अन्य व्यक्‍तींनी कोणत्याही कामांसाठी विद्यापीठात न येता ई-मेल अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही अधिकारी व कर्मचारीही करोनाबाधित आढळून आले आहेत. विशेषत: विद्यापीठात रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा बाहेरून विद्यापीठात येणारे कर्मचारी जास्त करोनाबाधित आहेत. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासंदर्भात डॉ. पवार म्हणाले, करोनाची सद्य:स्थिती पाहता विद्यापीठात येणाऱ्यांसाठी निर्बंध घातले आहेत. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी व्यतिरिक्‍त अन्य नागरिकांना विद्यापीठात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. बाहेरील व्यक्‍तींना विद्यापीठात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व पत्रव्यवहार ऑनलाइन, इ-मेलद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातवाईकांसाठी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शेठ ताराचंद रामनाथ आयुर्वेदिक रुग्णालय ट्रस्टच्या सहयोगाने लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार लसीकरणची प्रक्रिया सुरू आहे. तसेच सध्या विद्यापीठातील उपस्थिती 50 टक्‍क्‍यांवर आणली आहे. सर्व प्रशासकीय व शैक्षणिक विभाग सॅनिटायझर पूर्ण झाले असून, कर्मचाऱ्यांना वेळेनंतर कार्यालयात थांबता येणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या अतिरिक्‍त कामेही बंद करण्यात आली आहे.

वाचनकक्ष बंद करणार…
सध्या विद्यापीठातील वसतिगृहे बंद आहेत. तसेच येत्या 11 तारखेला एमपीएससी पूर्व परीक्षा होत आहे. तोपर्यंत विद्यापीठातील वाचनकक्ष सुरू राहणार आहे. ही परीक्षा संपताच वाचनकक्षही बंद केले जाणार आहे. परीक्षा होताच कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणखी कमी केली जाणार असल्याचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.