डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश
पिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय संशोधन केंद्रात सात महिन्याच्या बाळावर यकृताच्या कर्करोगाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. 11 सेंटीमीटरची व 460 ग्राम वजनाची यकृतामधील कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.
हडपसर येथील सात किलो वजन असणाऱ्या एका सात महिन्याच्या बाळाला पोटाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी प्रथमदर्शनी असे दिसून आले की बाळाच्या यकृतामधील डाव्या बाजूस गाठ असल्याचे निष्पन्न झाले.
तातडीने बाळाचे सी. टी. स्कॅन व रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्याअंती असे निदान झाले की यकृतामधील गाठ ही कर्करोगाची आहे. तात्काळ ही गाठ काढून त्यावर पुढील उपचार करणे गरजेचे हाते. बाळाच्या उपचाराबाबत सकारात्मक व नकारात्मक परिणामांची कल्पना कुटुंबियांना देण्यात आली. त्यांचे समुपदेशन करून बाळावर उपचार करत या गंभीर आजारातून त्याची सुटका करण्यात आली.
या बाळावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
यादरम्यान जीवाला कोणताही धोका न होता शरीरात कुठेही कर्करोगाचा संसर्ग होऊ नये याची बारकाईने काळजी घेत ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तासात पूर्ण झाली. यकृतामधील डाव्या भागासह कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ही गाठ सुमारे 11 सेंटिमीटरची होती तर तीचे वजन 460 ग्राम इतके होते. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. बाळाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या चिंताजनक स्थितीतून बाळास बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. बाळाच्या पुन्हा सर्व तपासण्या केल्या असून त्याला कोणताच धोका नाही. इतर आरोग्याबाबत कोणतेही दोष आढळले नाही.
या शस्त्रक्रियेसाठी बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव, यकृत प्रत्यारोपण तज्ञ् डॉ. दिनेश झिरपे, भूलतज्ञ् प्राध्यापक डॉ. छाया सूर्यवंशी, बालरोग भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली पाटील, सहायक प्रा. डॉ. स्मिता उभे व डॉ. स्मिता जोशी, भूलशास्त्र विभागप्रमुख तसेच बालरोग व बालरोग शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांचे पथक तसेच लहान मुलांचे अतिदक्षता विभागामधील सर्वांचे या शस्त्रक्रिया व उपचारासाठी सहकार्य लाभले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.
रुग्णालयातील अद्ययावत सेवासुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्रक्रियागृह, जलद सेवा देणारी वैद्यकीय यंत्रणा व विविध वैद्यकीय शाखेतील तज्ञ् डॉक्टर्स यांच्या साहाय्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आम्हाला यश मिळाले. तसेच योग्य वेळीच निदान व उपचार केल्याने हे बाळ कर्करोग मुक्त झाले. ही शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आली.
– डॉ. प्रणव जाधव, बालरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख.