Fake injections | cancer patients : कर्करोगाची अर्थात कॅन्सरची नकली औषधे विकणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी दिल्ली आणि गुरूग्राम येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन जण दिल्लीतल्याच एका मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना करणाऱ्या रूग्णांना बऱ्याच काळापासून हे भामटे फसवत होते असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.
दिल्ली पोलिसांनी या टोळीची माहिती मिळाली होती व त्यानुसार आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. कॅन्सरवरच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ९ ब्रँडच्या बनावट औषधांचा साठा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून त्याची किंमत ४ कोटी रूपये आहे.
नकली औषधांना कॅन्सरचे औेषध असल्याचे सांगत इंजेक्शन रिफिल करून त्याची विक्री केली जात होती. केवळ भारतातच नाही तर नेपाळ, आफ्रिकी देशांमधील नागरिकांनीही त्यांनी फसवल्याचे आढळून आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काय आहे प्रकरण? वाचा… । Fake injections | cancer patients
अत्यंत धक्कादायक प्रकारे हे रॅकेट चालवले जात होते. आरोपी अगोदर रूग्णालयांतून लेबल असलेल्या औषधांच्या रिकाम्या बाटल्या गोळा करत होते. त्यात नंतर बोगस औषधे भरली जरत असत. तीच औषधे नंतर कॅन्सरची औषधे असल्याचे सांगून त्यांची विक्री व्हायची.
पश्चिम दिल्लीतील दोन सदनिकांमधून त्यांचा हा काळा धंदा सुरू होता. दिल्ली पोलीस आणि दिल्ली सरकारचा औेषध नियंत्रक विभागाने गुरूग्राम येथे छापा मारून सात जणांना अटक केली. यात गुरूग्राम येतील हॉस्पिटल्सच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
त्यांच्या कडून चार कोटी रूपये किमतीच्या बोगस औषधांच्या १४० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विफिल जैन (वय ४६), सूरज शत (२८), नीरज चौहान (३८), तुषार चौहान (२८), परवेज (३३), कोमल तिवारी (३९) आणि अभिनय कोहली (३०) यांना अटक करण्यात आली आहे.