बिजींग – अफगाणिस्तानातील तालिबान्यांशी आमचा अधिकृत संपर्क आहे अशी जाहीर ग्वाही चीनने दिली आहे. तालिबान आता अधिक तर्कशुद्धपणे कार्यरत राहील आणि त्यांनी महिलांना स्वातंत्र्य आणि त्यांचे रक्षण करण्याची जी ग्वाही दिली आहे ते ती पाळतील असा विश्वासही चीनने व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आम्ही आदर करतो असेही चीनने म्हटले आहे. त्या देशातील सर्वच पक्षांच्या आणि गटांच्या मतांचाही आदर केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे असे चीनने अधिकृतपणे नमूद केले आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चूनयिंग यांनी हे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.
बुधवारी चीनने म्हटले होते की अफगाणिस्तानातील सरकार स्थापनेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आम्ही त्या देशाला राजनैतिक मान्यता द्यायची की नाही यावर निर्णय घेऊ. तथापि गुरूवारी मात्र हुआ यांनी चीन तालिबानबाबत अत्यंत विधायक प्रतिसाद देत आहे असे म्हटले आहे. जेव्हा तालिबानचे सरकार प्रत्यक्ष सत्तेवर येईल त्यावेळी आम्ही त्यांना मान्यता देऊ असेही चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर विविध बाबतीत जी भूमिका घेतली आहे ती विधायक, आधुनिक आणि उपयुक्त आहे असेहीं चीनचे मत आहे. अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न तालिबानकडून केला जाईल असा विश्वासही चीनकडून व्यक्त करण्यात आला आहे.