नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये (Afgan) तालिबानने महिलांविरोधी काढलेले फतवे मागे घेण्याची मागणी जगभरातील 80 देशांनी केली आहे. तालिबानने (Taliban) 2021 मध्ये अफगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतल्यापासून महिलांवर अत्यंत जाचक बंधने घातली आहेत. हे निर्बंध मागे घेण्यात यावेत, अशी मागणी करणारे संयुक्त निवेदन 80 देशांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडे केली आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, ब्राझील, संयुक्त अरब अमिराती, स्वित्झर्लंड, इक्वेडोर, अल्बेनिया आणि माल्टा या देशांनीही तालिबानकडून अफगाण महिला आणि मुलींना लिंग-आधारित हिंसा केली जात असल्याचे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. (United Nations)
तालिबानने अफगाणिस्तानमधील मुलींसाठीच्या बहुतेक शाळा बंद केल्या आहेत. महिलांना विद्यापिठांमध्ये प्रवेश नाकारला आहे आणि बहुतेक सर्व स्वयंसेवी संघटनांमध्ये कर्मचारी महिलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली आहे. युएई, ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, चिली यासह इतर 75 सदस्य देश आणि निरीक्षकांनी तालिबानला आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांवर आधारित महिला आणि मुलींच्या हक्कांचा आदर करण्यास सांगितले आहे.
तालिबानने महिलांविरोधात काढलेले हुकूम म्हणजे महिलाबाबत पद्धतशीरपणे केलेला बेदभाव, दडपशाही आणि हिंसाचार असल्याचे या देशांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये महिला आणि मुलींना पूर्ण, समान आणि अर्थपूर्ण सहभाग दिला जावा, अशी मागणीही तालिबानकडे करण्यात आली आहे. तसेच तालिबानने महिलांवर लादलेले निर्बंध इस्लाम आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या विरोधात आहेत, असेही या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
तालिबानने दावा धुडकावला
शरीया कायद्यानुसार अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण केले जात असल्याचा दावा तालिबानने केला आहे. महिलांच्या हक्कांची तालिबानने कधीच पायमल्ली केलेली नाही आणि केली जाणारही नाही, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिदीनने म्हटले आहे. शरीया कायद्यानुसार महिला आणि पुरुष समान नाहीत, असे तालिबान नियुक्त उच्च शिक्षणासाठीचा प्रभारी मंत्री नेदा मोहम्मद नदीम याने म्हटले आहे.
महिला आणि मुलींना त्यांचे अधिकार वापरता यावेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आणि इस्लामच्या शिकवणूकीला अनुसरून आणि अफगाण समाजाच्या प्रगतीमध्ये आर्थिक, सामाजिक योगदान देण्याची परवानगी तालिबान प्रशासनाला आमही करत आहोत.
लाना नुसीबेह
– संयुक्त राष्ट्रातील संयुक्त अरब अमिरातीच्या स्थायी प्रतिनिधी