मुंबई – कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले आहे.
कॉंग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेने आजवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या घोषणा देत राजकारण केले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार विरोध केला होता.
कॉंग्रेस, सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रखर विरोध केला होता. मात्र त्यांचे चिरंजीव सत्ता टिकविण्यासाठी याच सोनियांपुढे गुडघे टेकवत आहेत. कॉंग्रेसपुढे गोंडा घोळण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनी व शिवसेनेने राज्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ करू नये, असा खोचक सल्लाही उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.