नवी दिल्ली – भारत सरकारने ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेन्का विकसित कोविशिल्ड या करोनावरील लसीच्या एक कोटी 10 लाख डोसची ऑडर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे नोंदवली. प्रती डोस 210 रूपये (जीएसटीसह) मुल्य निश्चित करण्यात आले आहे. आज सायंकाळी उशीरा याचा पुरवठा सुरू करण्यात आला.
लसीच्या प्रत्येक डोसची किंमत 200 रुपये आणि जीएसटीचे 10 रुपये अशी लसची किंमत 210 रुपये असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एचएलएल लाईफकेअर लिमिटेडचे अतिरिक्त संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी ही ऑर्डर नोंदवली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून भारत बायोटेकच्या संपूर्ण स्वदेशी कोव्हॅक्सिन या लसीची ऑर्डर लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताच्या औषध नियामकांनी या दोन्ही संस्था उत्पादित करत असलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला नुकतीच मान्यता दिली होती. आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार या दोन्ही लस सुरक्षित आणि पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती तयार करणाऱ्या आहेत.
करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहीमेचे वर्णन जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असे केले आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि करोना योध्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 27 कोटी 50 वर्षावरील नागरिक आणि धोकादायक गटातील नागरिकांचे येत्या काही महिन्यांत लसीकरण करण्यात येणार आहे.