कामशेत – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ला हा नेहमीच चिमुकल्यांचा आकर्षणाचा विषय असतो. मराठा साम्राज्याचे संरक्षक असलेल्या आपल्या कल्पनेतील प्रतापगड, रायगडाच्या कलाकृती साकारण्यासाठी मावळमधील छोटे मावळे कामाला लागले आहेत.
दिवाळीच्या सुट्या लागल्या असल्याने शाळेव्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत मावळे दगड, विटांचे तुकडे आणि मातीच्या चिखलात रमू लागले आहेत. त्यामुळे आपला किल्ला हुबेहूब असावा, यासाठीची सर्व काळजी घेतली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, किल्ल्यावरील हे बुरूज, तळी, तोफा तैनात करताना हुबेहूब जंगल तयार करण्यासाठी मोहरी, हळीव पेरले जात आहे. त्याचबरोबर अरण्यातील प्राण्यांसाठी गुहा आणि चोर वाटा तयार होत असून या किल्ल्यांना आकार येऊ लागल्याने मराठ्यांच्या पराक्रमाला नव्याने दिवाळीत नव्याने उजाळा दिला जात आहे.
बाल गोपाळांमध्ये उत्साह
सध्याच्या महागाईच्या झळा या किल्ल्यांनाही लागल्या आहेत. मावळ्यांसह सर्व खेळण्यांच्या तयार किल्ल्यांच्या किमती वाढल्या आहेत. अनेक कुटुंबांत घरगुती किल्ले तयार केले जातात. शाळेला सुट्या लागल्याने संध्याकाळी गृहपाठानंतर किल्ला बनवण्यात बालगोपाळ रमू लागले आहेत.
तयार किल्ल्यांना पसंती
रंग, प्लास्टर ऑफ पॅरिसचे दर वाढल्याने तयार किल्ल्यांच्या किमती वाढल्या आहेत. बाजारपेठेत कागदी पुड्यांपासून तयार केलेले किल्ले, मुख्य दरवाजेही उपलब्ध किल्ल्यावर ठेवण्याची खेळणी, सैनिक, मावळ्यांचेही दर वाढले आहेत. त्यामुळे तयार किल्ला 350 ते 800 मावळे 25 ते 50, भटजी, पैलवान, पुंगीवाला बाबा 25 ते 50 रुपये तसेच सैनिक 10 ते 25 रुपये तर गवळण 35 ते 50 रुपयांना मिळत आहे.