– प्रतिनिधी
“ओशो’ या नावाभोवती एक वलय आहे. त्यांच्याबद्दल समज असण्यापेक्षा गैरसमजच अधिक आहे. अत्यंत बुद्धिमान, सर्वसमावेशक विचार करणारे आणि मुख्य म्हणजे सर्व धर्मांचा साकल्याने आणि परिपूर्ण अभ्यास आपल्या विचारातून प्रकट करणारे असे हे खरे व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, त्यांच्या “संभोगाकडून समाधीकडे’ या पुस्तकाच्या केवळ शीर्षकावरूनच त्यांच्याबद्दल काही प्रतिवाद निर्माण झाले. मूळ पुस्तक वाचण्यापेक्षा आणि त्यातील आशय समजून घेण्यापेक्षा त्याला विशिष्ट चौकटीत बसवून ते पुस्तक आणि ओशो यांच्याबद्दल एक वेगळा समजच लोकांनी-समाजाने करून घेतला.
कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला, असा एक वाद या आधीही निर्माण झाला आणि तोही साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गाजला; पण एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्या समजून घेताना त्यांच्या जाणिवेतून नाही तर नेणिवेतून त्या समजून घेण्याची एक अभ्यासपूर्ण वृत्ती असायला हवी असते आणि ती “ओशों’कडे होती, ती त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या प्रवचनांमधून सहज दिसून येते. सुनील निकाळजे यांनी “ओशों’च्या अशाच विविध पैलूंवर “ओशो- समज-गैरसमज’ या पुस्तकातून परामर्श घेतला आहे.
ओशो यांच्याबाबत बरेच सत्य-असत्य बोलले गेले. त्यांना “सेक्स-गुरू’ म्हणूनही खरे तर हिणवले गेले, त्यांना मारण्याच्या धमक्या आल्या, तुरुंगात टाकले, बहिष्कृतही केले गेले; पण एक आहे- “ओशो’ हे रसायनच वेगळे आहे. या सर्वांतून तावून-सुलाखून निघून त्यांनी एक वेगळा ठसा समाजमनावर उमटवला आहे. हे व्यक्तिमत्त्व समजून घेणे तसे अवघड आहे आणि सोपेही आहे. “ओशो’ ज्यांना समजले असे ज्यांचा अभिनिवेश आहे, त्यांना ओशो खरेच कळले आहेत का, हाही एक प्रश्नच आहे.
ओशोंचे असेच व्यक्त आणि अव्यक्त असे पैलू समाजासमोर आणण्याचे काम सुनील निकाळजे यांनी केले आहे. या पुस्तकातील धर्म, विनोद बुद्धी आणि चमत्कारीकपणा, एकटेपणा, मित्रता, प्रेम-विवाह-परिवार-समाज, मनाची चाल, भाग्य/नशीब, विचारसंग्रह- विवेकाच्या मार्गातील मुख्य अडसर, जननिंदेची भीती- आत्म्याशी तडजोड, वासना ही काही प्रकरणे या पुस्तकातील वाचली तरी “ओशो’ या व्यक्तिमत्त्वाशी भावनिक नाते जोडता येते. ओशो धर्म-गुरू आहेत, प्रेम-गुरू आहेत. ते ईश्वरोपासना प्रेमाच्या माध्यमातून सांगतात. ते “अ-मृता’ची भाषा सहजसोप्या पद्धतीने सांगतात आणि ते जीवन कलेचे साधन आहे, हेही पटवून देतात. यासाठीच हे पुस्तक वाचण्याची गरज आहे.
(नीळकंठ प्रकाशन, पुणे – किंमत 250 रुपये)