कोपरगाव -कोपरगाव मतदारसंघात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून देखील कोपरगाव मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यांच्या यादीत कोपरगाव मतदार संघाचा देखील समावेश करावा, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन शासनाने मतदारसंघाचा देखील दुष्काळाच्या यादीत समावेश केला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली.
मतदारसंघात दरवर्षीपेक्षा यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. सलग दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाणी पातळी खालावली गेली असून पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहे. तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या शेजारील येवला व सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
मात्र, दुष्काळसदृश्य परिस्थिती असून देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता. परंतु आ. आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा दुष्काळाच्या यादीत समावेश करण्याची मागणी करून त्याबाबत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहेगाव बोलका, पोहेगाव व पुणतांबा या मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.