वाघळवाडी – मेणबत्ती घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून दिवसेंदिवस या घोटाळ्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. यात एजंट अभिजित डोंगरे (रा. वाघळवाडी, ता. बारामती), राजन भिसे (रा. लोणंद, ता. फलटण) या दोन संशियांतांची नावे पुढे आली असून डोंगरे रविवारी (दि. 22) पोलिसांसमोर हजर झाला. तर भिसेचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तर याबाबत चौकशी सुरू असून आणखी काही तक्रार अर्ज आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिली.
मेणबत्त्या बनविण्याच्या लघु व्यवसायाचे आमिष दाखवलेल्या महिलांची संख्या पुरंदर, बारामती, लोणंद, खंडाळा आदी परिसरात मोठी आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 21) लोणी भापकर येथील महिलांनी सामुहिक अर्ज तक्रार अर्ज दिला होता. तर रविवारी (दि. 22) करंजेपूल पोलीस दूरक्षेत्रावर सोमेश्वरनगर परिसरातील महिलांनी सामुहिक तक्रार अर्ज दिलेला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले की, महिलांच्या तक्रार अर्जानुसार महिलांना कर्ज दिलेल्या अजित मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्याकडून विठूमाऊली उद्योग समूहाच्या अंतर्गत ज्या महिलांना कर्ज दिले आहे. त्या सर्व कर्जदारांची कागदपत्रांची प्रत मागण्यात असून त्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.