पुणे – येत्या एक एप्रिलपासून 45 वर्षे वयावरील नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्याला सुरूवात केली जाणार आहे आणि त्याच वेळी लस तुटवड्याचा सामना पालिकेला करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशी लसच उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहेच, आता तर केवळ सात हजारच डोस शिल्लक असल्याने एक तारखेला काय करायचे? असा मोठा प्रश्न पालिकेला पडला पडला आहे.
शहरात 16 जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. 1 मार्चपासून 60 वर्ष वयावरील आणि 45 वर्षे वयावरील कोमॉर्बिड नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. तर येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्षे वयावरील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. ही संख्या सुमारे साडेदहा लाख आहे.
सध्या शहरात 109 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. मधल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर उद्दिष्टापेक्षा दीड ते दोनपट लसीकरण झाले. दररोजच्या लसीकरणाची संख्या 18 हजारांपर्यंत पोहोचली होती.
मात्र, मागील काही दिवसांपासून अनेक केंद्रांवरून नागरिकांना लस न घेताच परतावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्येही याहून वेगळी परिस्थिती नाही. सध्या महापालिकेकडे केवळ 7 हजार डोस शिल्लक आहेत. प्रत्येक केंद्रांला दररोज 100 डोस द्यायचे झाले तरी दररोज 11 हजार डोसची गरज आहे. मात्र, लसीकरणात खंड पडू नये, यासाठी उद्दिष्टापेक्षा कमी डोस दिले जात आहेत. डोसच शिल्लक नसल्याने आज ही परिस्थिती आहे तर एक एप्रिलला काय होईल याची चिंता असल्याचे, महापालिकेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठक घेतली. ही बैठक सुरू असतानाच पवार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना मोबाइलवर संपर्क साधला. केंद्राने राज्याला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी, तसेच 25 वर्षावरील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी केली. तातडीने लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात येईल आश्वासन जावडेकर यांनी दिले होते. या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न आताची परिस्थिती पाहिल्यावर उपस्थित होऊ लागला आहे.