सातारा – सातारकर दरवर्षी ज्या महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या “गुलमोहर डे’निमित्तच्या महोत्सवाला यावर्षी कलावंत आणि रसिकांनीही ऑनलाइन साथ दिली. करोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष एकत्र न येता सोशल मीडियावरून गुलमोहराविषयी भावना व्यक्त करून कलावंतानी आनंद लुटला तर रसिकांनीही त्याला भरभरून दाद दिली.
वैशाख सुरू लागला की सुरु होते लाल- केशरी, गुलाबी रंगांची मुक्त उधळण, जागोजागी गुलमोहराच्या झाडांना बहर येतो, अन् या निसर्ग महोत्सवाची साताऱ्यात ‘गुलमोहर डे’ने सुरुवात होते. गेली 20 वर्षे अव्याहत सुरु असलेला हा महोत्सव यंदा फिजिकल डिस्टन्स पाळून ऑनलाईन साजरा झाला. साताऱ्यात एक मे रोजी “गुलमोहर डे ‘ म्हणून साजरा करण्याची परंपरा 2000 पासून आहे. मे महिन्यात गुलमोहराच्या झाडाला बहर येतो.
लाल- केशरी फुलांनी ते झाड बहरून येते. फुलांनी नखशिखांत डवरून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एकेक फूल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा, हा गुलमोहराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवाला येतो. त्याची आठवण ठेवणारा वर्षातला एक दिवस असावा, या भावनेतून गुलमोहराला अर्पण केलेला दिवस म्हणून ‘गुलमोहर डे’ साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. साताऱ्यातील पोवई नाक्यावरुन पोलिस कवायत मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा गुलमोहरांची बरीच झाडं आहेत. या रस्त्यावर दूध संघाजवळ गुलमोहराच्या मोठ्या वृक्षाखाली हा महोत्सव साजरा केला जातो. या वृक्षाप्रति कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा, व्यक्त करण्यासाठी साताऱ्यातील चित्रकार, कवी, शिल्पकार, छायाचित्रकार व संवेदनशील नागरिक एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात.
वृक्षास पाणी घालून उत्सवाची सुरुवात होते. मनोगते, कविता, चित्रे, प्रात्यक्षिके, शिल्प व लहान मुलांसाठी चित्रकलेसह विविध स्पर्धा, खेळ, चित्रांचा डिस्प्ले तिथे घेतला जातो. दरवर्षी याठिकाणी होशी सारकर गुलमोहर डेचा हा वेगळा आनंद लुचत असतात. यावर्षी करोनाच्या संकटामुळे रेड झोनमधील सातारा लॉकडाऊन आहे. त्यामुळे कवी, चित्रकार, छायाचित्रकार आदी मंडळींनी आपापले कला प्रकार सोशल मिडीयाद्वारे जनतेपुढे सादर करीत गुलमोहर डे ची परंपरा ऑनलिान पद्धतीने पुढे नेली. गुलमोहराशी निगडीत चित्रे, कविता आदी प्रकारांतून अनेकांनी आपल्या गुलमोहराविषयी भावना व्यक्त केल्या सोसल मीडियावर त्याला चांगली दादही मिळाली. सदरबझारमधील संगीता नागरे यांनी गुसमोहर डेच्या पूर्वसंध्येला आपल्या घरासमोर गुलमोहर डेची रांगोळी रेखाटली होती.