सातारा – चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर साखर कारखान्यातील एका खोलीत संतोष रावसाहेब सातपुते (मूळ रा. नायगाव, जि. बीड) आणि सोमनाथ कारभारी गोल्हार (रा. कापशी, जि. बीड) या कामगारांमध्ये दि. 1 जानेवारी 2016 रोजी वाद झाला होता. त्यावेळी संतोष सातपुते याने सोमनाथ गोल्हार यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी आरोपी संतोष रावसाहेब सातपुते (मूळ रा. नायगाव, जि. बीड) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी, संतोष सातपुते व सोमनाथ गोल्हार हे चिमणगाव येथील जरंडेश्वर साखर कारखान्यात हमाली करत होते. ते दोघे तेथील चाळीत रहात होते. सोमनाथ हा आपल्याबाबत चुगल्या आणि शिवीगाळ करत असल्याची शंका संतोषला होती. त्यामुळे चिडून जाऊन संतोषने सोमनाथबरोबर भांडण करून, बघून घेतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2015 रोजी मध्यरात्री कारखाना स्थळावरील खोली क्रमांक 1031 मध्ये रात्री 11 च्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता.
यात संतोषने कोयत्याने सोमनाथ गोल्हार याच्या तोंडावर व मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला होता. याप्रकरणी गणेश भगवान मोरे (रा. निमसोड, ता. खटाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष सातपुते याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी.बागवे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्यापुढे झाली. त्यामध्ये सहाय्यक जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाला प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शमसुद्दीन शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर, राजेंद्र कुंभार, अमित भरते, शेख, अश्विनी घोरपडे यांनी सहकार्य केले.