पुणे – राज्यातील कारागृहांची सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात येत आहे. यात 12 कारागृहांत ड्रोन तैनात असतील. कारागृहांचा आतील आणि शेती परिसर विस्तीर्ण आहे. येथे कैद्यांच्या हालचालींवर पहारा आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. ही माहिती कारागृह विभाग अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
महाराष्ट्र कारागृह विभागातर्फे आयोजित ड्रोन उपकरण प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमात गुप्ता बोलत होते. यावेळी उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अतिरिक्त अधीक्षक सुनील ढमाळ उपस्थित होते.
कारागृहात ड्रोनसाठी 2018 मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता. याचा एक डेमो येरवडा कारागृहात झाला होता. मात्र, फाइल लालफितीत अडकली. गुप्ता यांनी विभागाची सूत्रे स्वीकारताच पाठपुरावा केला. हे ड्रोन “नाइटव्हिजन’ आहेत. ते चालवण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. याव्दारे कारागृहातील संपूर्ण सुरक्षा तपासता येणार आहे. गुप्ता म्हणाले, “पालघर आणि नगर जिल्ह्यांत नवीन कारागृह उभारण्यात येणार आहेत. शिवाय, आणखी दोन नवीन कारागृह उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. उद्योजक सायरस पूनावला यांनी येरवडा आणि कोल्हापूर कारागृहांतील कैद्यांना गरम पाणी देण्यासाठी मदत करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. शिवाय, विभागासाठी 1,200 संगणक मागितले आहेत.’
कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी
कारागृह विभागात अनेक वर्षे भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. सध्या पाच हजार कर्मचारी कार्यरत असून, दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. मागील वर्षी 120 कैद्यांचा प्रकृतीच्या कारणास्तव कारागृहात मृत्यू झाला. त्यांची आरोग्य तपासणी नियमित करून हे प्रमाण यंदा शुन्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.