पुणे – महाविद्यालयांना स्वायत्त दर्जासाठी यापुढे संबंधित विद्यापीठाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यासाठी थेट विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
“यूजीसी’ने या नियमावलीत बदल करून त्याचा मसुदा प्रसिद्ध केला होता. त्यावर हरकती-सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंतिम केलेल्या नियमावलीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार स्वायत्ततेसंदर्भातील नियमांमध्ये बदल आणि स्वायत्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.
नव्या नियमावलीनुसार स्वायत्ततेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या आणि स्वायत्त दर्जा घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयाला “यूजीसी’च्या संकेतस्थळावर कधीही अर्ज करता येईल. त्यानंतर संबंधित विद्यापीठाला महाविद्यालयाचा अर्ज आल्यानंतर तीस दिवसांत त्या अर्जाची पडताळणी करून शिफारशी सादर कराव्या लागतील. तीस दिवसांत शिफारशी न कळवल्यास संबंधित विद्यापीठाला आक्षेप नसल्याचे गृहित धरले जाणार असल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.