वाढेफाटा परिसरातील दुकानाच्या परिसरात पथकाला आढळली गांजाची झाडे
पाच लाख 22 हजारांची चार झाडे जप्त
सातारा – वाढे फाटा (ता. सातारा) येथे भंगाराच्या दुकान परिसरात गांजाची लागवड करणाऱ्या परशुराम रामफेर ठाकूर (वय 35, रा. रघुनाथपुरा, करंजे) या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने आज ताब्यात घेतले. या कारवाईत पाच लाख 22 हजार रुपये किंमतीची वीस किलो वजनाची गांजाची चार झाडे जप्त करण्यात आली.
पोलिसांनी यासंदर्भात दिलेली माहिती अशी की वाढे फाटा येथे एका भंगाराच्या दुकान परिसरात एका व्यक्तीने गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासना केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी दुपारी वाढे फाटा येथील दुर्गामाता स्क्रॅप मर्चंट या दुकानात छापा टाकला. दुकानाच्या परिसरात गांजाची लागवड करण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. या गांजाची एकूण किंमत पाच लाख 22 हजार रुपये आहे. गांजाचे वजन वीस किलो असून चार झाडे जप्त करण्यात आली.
सातारा शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार या कलमाअंतर्गत संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे,े पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, प्रवीण फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, वैभव सावंत, धीरज महाडिक, संभाजी साळुंखे, फॉरेन्सिक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार जाधव व अमोल जाधव यांनी सहभाग घेतला.