तळेगाव दाभाडे, दि. 4 (वार्ताहर)- तळेगावमधील एका रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी महसूलमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे एकत्र येणार आहेत. यानिमित्त रंगणाऱ्या राजकीय जुगलबंदीविषयी मावळवासियांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित ऑन्को-लाईफ कॅन्सर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन राष्ट्रवीाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.7) होणार होते . मात्र प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्याऐवजी शुक्रवारी (दि.11)विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता या रुग्णालयाचे उद्घाटन होईल.त्यामुळे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बदल करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे असून माजी आमदार कृष्णराव भेगडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे.
मावळातील खाणींवरून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यात चांगलेच लेटरवॉर रंगले आहे. त्यामुळे मावळातील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. याशिवाय दिवाळी संपली, तरी राज्यात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राजकीय वक्तव्यांचे आपटबार सुरूच आहेत. अनेक दिवसांनंतर राजकारणातील दोन्ही “दादा’ या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी तळेगावकरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.