एक रात्र अशीही…

रोजची तीच ती धावपळ आणि त्याच त्या गोष्टी करून खरेतर खूप कंटाळा आला होता, “बस झालं आता या पुढे मी नाही करणार, मला हवे तसे वागणार’, हे असे दिवसातून हजारो वेळा तरी बोलून व्हायचे माझे, पण पुन्हा झोपायच्या आधी सकाळी करायच्या, त्या ठरलेल्या कामांची यादी मात्र तयार असायची नेहमीच. असो आज ऑफिसमधून निघताना दोन दिवस सुट्टी आहे, या एका विचाराने तरी मनाला थोडासा दिलासा दिला होता, यात काही शंका नाही. म्हणून तर आज किती तरी महिन्यांनी मी माझे आवडते आणि सदाबहार गायक किशोरकुमार यांची गाणी ऐकत स्वयंपाक करत होते, नाहीतर एरवी फोनवर ऑफिसच्या कामांचा पुन्हा घरी आराखडा घेताना, किंवा आईशी नाहीतर ऑफिसमधल्या मैत्रिणीशी बॉसचा राग काढत माझा स्वयंपाक कसा व्हायचा हे मला ही कळायचे नाही. आज माझ्या या अशा वागण्याचे मला ही आश्‍चर्यच वाटत होते. चक्क आज मी घरी आल्यापासून चिडचिड केली नाही, हे पाहून उगीचचं गर्व वाटत होता आणि या भावनेचे हसू ही येत होते. पण हे असे होणे स्वाभाविकच होते कारण गेल्या कित्येक महिन्यांमध्ये ही अशी सुट्टी किंवा मला स्वतःसाठी वेळ असा मिळालाच नव्हता, म्हणून तर आज खूप वेगळ भासत होतं.

जेवण केल्यानंतर रोज कधी झोपते असे व्हायचे, पण आज प्रथमच मला ती झोप नकोशी वाटत होती. काहीवेळ टीव्ही वर गाणी पाहिली, पण कंटाळा आला म्हणून परत टीव्ही बंद केला. माझे नेहमीचे आवडीचे, पुस्तक वाचायचा प्रयत्न केला, मला आवडणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता ही वाचल्या पण, काही केल्या मन काही रमत नव्हते, मग म्हणून स्वयंपाकघरात जाऊन मी कॉफी करायला गेले, जेणेकरून थोडसं छान वाटेल. ती गरमागरम कॉफी घेऊन सोफ्यावर मोबाइल घेऊन बसले, पण आज का कोण जाणे तो मोबाइलही नकोसा वाटला म्हणूनच तो कॉफीचा तो वाफाळणारा मग घेऊन मी बाल्कनीचा दरवाजा उघडून, बाल्कनीत गेले. जशी वाऱ्याची एक लकेर स्पर्शून गेल्यावर मनामध्ये एक शहारा निर्माण होतो, अगदी तसेच काहीसे झाले, जे मला जाणवले, पण आता शब्दांत व्यक्त करणे मात्र अवघड वाटत आहे. इकडे तिकडे बघताना, रस्त्यावरची ती थोडीशी नीरव शांतता आणि मधे-मधे असलेली वाहनांची ये-जा बघता बघता, सहजच लक्ष गेले, ते बाल्कनी जवळ असलेल्या दोन झाडांमधून डोकावणाऱ्या त्या चंद्राकडे. क्षणभर तो चंद्र जणू मलाच पहातोय असा भास झाला जणू. मी ही मग कॉफी घेत घेत त्याच्याकडे पहात होते. आज हा चंद्र मला खूप सुंदर वाटत होता आणि एरवी मला न आवडणारी ही रात्र, हो हीच रात्र खूप छान वाटत होती.

आज कितीतरी दिवसांनी असं एक आंतरिक समाधान गवसल्याचा एक आनंद मिळत होता आणि मनातले सारे मी त्या चंद्राशी बोलत होते आणि जणू तोही ऐकून घेत होता, मला समजावत होता. कितीतरी दिवसांनी आज मी स्वतःशीच गप्पा मारत होते. ही रात्रीची शांतता मला क्षणोक्षणी सुखावून जात होती. आणि जणू मला सांगत होती,
“कधीतरी अशीचं तू, स्वतःशीही बोलत जा,
कधीतरी अशीचं तू, मलाही भेटत जा..
कधीतरी अशीचं तू, या रात्रीला वेचत जा,
आयुष्यासाठी सोनेरी क्षण, साठवतं जा..।।’

बस्सं या एका रात्रीने किती किती आठवणी जाग्या झाल्या होत्या, अवघ्या काही वेळांतच मी किती क्षण वेचले होते, नेहमीपेक्षा वेगळे असे काहीतरी केले होते. आज पुन्हा खरेतर मला माझ्यातली मी नव्याने सापडले होते, हे मात्र नक्की…!!

– ऋतुजा कुलकर्णी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.