“अ‍ॅलेक्सा, एक पुस्तक वाचून दाखव!”

माणसाच्या उत्क्रांतीचा विचार केला असता शेतीचा शोध, आगीचा शोध, चाकाचा शोध असे ठळक टप्पे आपणाला दिसून येतात. या सामाजिक उत्क्रांतीनंतर कालांतराने माणसाचा मेंदूही प्रगत होत गेला आणि या प्रगतीसाठी वाचनाने महत्त्वाची कामगिरी बजावली. वाचनसंस्कृतीची सुरुवात चित्रलिपीने झाली असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

लेण्यांमध्ये कोरलेली चित्रे अनेक गोष्टी सांगतात. तत्कालीन परिस्थितीची, संस्कृतीची ओळख करून देतात. अक्षरांच्या शोधानंतर भाषा घडल्या आणि शिलालेख तयार होऊ लागले. प्रगतीचे टप्पे पार करत करत पुस्तकांचा शोध लागला आणि वाचन संस्कृती अधिक बहरू लागली.

आज आपण ई-बुक्सच्या जमान्यात आलो आहोत. मोठमोठाले ग्रंथ, कादंबर्‍या आज एका क्लिकवर आपल्या हातात, खिशात आल्या आहेत. आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त ई-पुस्तकांचा आणि ई-वाचन संस्कृतीचा घेतलेला आढावा…!

पुस्तकांचा वाढत्या किमती, त्यांना ठेवण्यासाठी लागणार्‍या जागेची समस्या, पुस्तकांची काळजी न घेता येणे यावरचा एक जालिम उपाय म्हणजे ई-बुक्स! या ई-बुक्सची मॉर्गन या संशोधकाने केलेली व्याख्या म्हणजे खास वाचन करण्यासाठी केलेली सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची रचना जी एचटीएमएल (हायपर टेक्स्ट मार्कअप लॅंग्वेज) ही संगणकीय भाषा वापरून तयार केलेल्या ई-टेक्स्टपेक्षा वेगळी आहे. ई-बुक्सची संकल्पना सर्वप्रथम वेनेवर बूश याने १९४५ मध्ये आपल्या ‘अ‍ॅज वी मे थिंक’ या निबंधातून मांडली.

ही ई-बुक्स आपल्या मोबाईलमध्ये आपण डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्यामुळे आपण ती केव्हाही वाचू शकतो. अगदी अंधारातही ही ई-बुक्स आपल्याला वाचता येतात. ई-बुक्सच्या बर्‍याच लेखकांनी त्यात काही लिंक्सचा समावेशही केलेला असल्याने आपण वाचत असताना अधिक माहितीसाठी त्या लिंक्स पाहू शकतो.

काही पुस्तकांना पूरक असा ऑडिओही उपलब्ध असतो. त्याचाही आपल्याला फायदा होतो. पुस्तकांच्या मानाने ई-बुक्स स्वस्त असतात आणि प्रवासात सोबत करण्यासाठीही उपयोगी ठरतात. त्यामुळे आता वाचन न करण्यासाठी पळवाटा शोधणार्‍या सगळ्यांना वाचनाकडे आणण्याचा एक मार्गच या निमित्ताने खुला झाला आहे.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपण बाहेर जाऊन पुस्तके घेऊ शकत नाही, ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचू शकत नाही. अशावेळी वाचनात खंड पडू न देण्यासाठी ई-बुक्स उत्तम पर्याय आहेत. “तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथील बंधनात, मूर्ख हस्ते न दातव्यं एवं वदति पुस्तकम।“ म्हणजेच तेलापासून, पाण्यापासून, सैल बांधणीपासून तसेच मूर्खांच्या हाती पडण्यापासून माझे रक्षण करा असे म्हणणार्‍या पुस्तकानेही आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पण तरीही अजूनही काही जण पुस्तक वाचण्याच्या पारंपरिक पद्धतीलाच पसंती दर्शवतात. बाहेर पडणारा पाऊस, हातात चहा/कॉफीचा मग आणि रंगात आलेली कादंबरी ही फॅन्टसी अजूनही कायम आहे. आता ऑडिओ बुक्ससुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

आज अ‍ॅलेक्सा, सिरी गाणी लाव, हे सर्च कर, ते सर्च कर असे आपले हट्ट पुरवत आहेत. उद्या कदाचित पुस्तके वाचूनही दाख़वतील. शेवटी काय, काळ बदलत जाईल, पुस्तकांचे स्वरूप बदलेल, भविष्यात होणार्‍या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे अजून वेगळी पुस्तके आपल्यापर्यंत येतील. पण काहीही झालं तरी, कोणत्याही पद्धतीने वाचू पण वाचनाचा हात सुटू देता कामा नये. कारण “वाचाल तर वाचाल” हे सत्य काही बदलणार नाही!

– वैष्णवी सविता सुनिल कारंजकर

संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.