PrabhatBlog: शेतकरी देखील कोरोना योद्धाचं!

– संदीप कापडे 

शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते. पण आज शेतकऱ्यांनी हे सिद्ध केलय संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे बंद असताना. शेतकरी मात्र आपल्या शेतात राबत होता. ते फक्त जगासाठी. त्याला भीती वाटत नसेल का? नक्कीच वाटत असेल पण जस कोरोनामुळे जग थांबलं तसेच शेतकरी जर थांबला तर जग उपाशी असेल. त्यामुळे शेतकरी सुद्धा कोरोना योध्दाच आहे. पण दुर्दव्य म्हणावे लागेल आपल्याला, सरकारला याचे भान नाही.

कोरोनाने भारतात एन्ट्री केली आणि संपूर्ण देश थांबला. पंतप्रधान, मुख्यमंत्री  लाईव्ह येत होते. सतत सूचना देत होते. काय बंद, काय सुरु राहील सांगत होते. काही अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण देश बंद होता. पण शेतकरी मात्र थांबाला नव्हता. कोणी आपल्या शेतातील पिके काढत होते, तर कोणी आपल्या शेताची मशागत करत होत. त्यांचं ध्येय फक्त एकच होत. आपल्या सोबत जगाच पोट भरलं पाहिजे. लॉक डाऊनमध्ये तुम्ही चैनीच्या वस्तू सोडून जगला असाल. पण अन्नाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. लॉक डाउनच्या काळात तर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला मोफत वाटला. आपल्या शेतात राब-राब राबून पिकवलेल सोन त्याने मोफत दिल. आणि हे फक्त शेतकरीच करू शकतो. शेतकऱ्यांप्रती राजकीय दृष्टिटिकोन जरी बदलला नसला तरी शेतकरी नेहमी समाजाचं हित पाहत असतो.

गेल्या सरकारं सारख्या या सरकारच्या घोषणा देखील शेतकऱ्यांसाठी पोकळ ठरल्या. सरसकट कर्जमाफी कागदावरच राहिली. नियमित कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ झालाच नाही. हे संतापजनक तर आहेच. पण काय करणार आपल्या देशात राजकारण्यांना सर्वोच्च स्थान आहे. आज या कोरोना सारख्या कठीण परिस्थिती बँकेतील अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जात आहेत.  वसुली करत आहे. जुनं कर्ज परतफेड केल्याशिवाय नवीन कर्ज नाही, असे ठाम सांगत आहेत. आणि मुख्यमंत्री म्हणतात जून कर्ज असलं तरी शेतकऱ्यांना वाटप द्या, पण ही घोषणाच झाली. ग्राउंडलेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. राज्यात कोणतेही सरकार असो, घोषणा आणि अंमलबजावणी यांचा कधीच मेळ लागत नाही. मग लोकांनी आत्मनिर्भर बनायचं तरी कस ? असा प्रश्न उपथित होतो.

काही दिवसांपूर्वी विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्याचा कॉल आला. म्हणाला, अनपेक्षित संकट आलय शेतातील गहू घरात आहेत. बँकेतले अधीकारी दारावर आलेत. दलाल कमी भावात गहूं मागत आहेत. काय करू? हा प्रश्न शेतकऱ्यांविषयी जाण असलेल्या अनेकांना निशब्ध करेल, कदाचीत याच व्यापारी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असतील. एवढी मेहनत घेऊन शेतकरी आज प्रगत झाला नाही. याला फक्त सरकारचे धोरणे, आणि राजकीय मानसिकता जबादार आहे.  त्यात नुकत्याच आलेल्या निसर्ग वादळाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ केली. कांदा, गहू, गुरांचा चारा या पिकांची नासधूस करून वादळ परत गेले. हीच परिस्थिती द्राक्ष, केळी, भाजीपाला उत्पादक आणि फळ उत्पादकांची आहे. लॉकडाउनसारखे अनपेक्षित संकट ‘आ’ वासून शेतकर्‍यांच्या पाचवीला पूजले आहे.

जवळ -जवळ ७३ वर्ष झाली भारत स्वातंत्र्य होऊन. पण शेतकरी मात्र सुखी झाला नाही. स्वातंत्र्यानंतर ५२ टक्के मुख्य व्यवसाय शेती हा होता . अन्य कोणता उद्योग अस्तित्वात नव्हता. त्यामुळे शेती प्रमुख व्यवसाय होता. तसेच तेव्हा भूक हा मोठा प्रश्न होता तो सोडवण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा. पण आज तोच शेतकरी गरीब आहे. आधुनिक युगात शेतकरी त्याच्या शेतीतच गुंतून आहे. आज सरकार विविध योजनांचा गाजावाजा करते. पण वास्तविक चित्र मात्र वेगळंच आहे. आज शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. जो आहे त्यातही दलालांची भागीदारी. त्याच्या मालाला भाव असतो पण पीक शेतात असत तेव्हा एकदा का पीक शेताच्या बाहेर आलं भाव जमिनीवरच पडतात. यालाही जबाबदार शेतकरी का? कधी कधी प्रश्न पडतो खरच हे राजकारणी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असतील का? कि फक्त घोषणाच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या. खरच खुप निर्दयी म्हणावे लागेल या सरकारला.

केपीएमजीने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ‘पोटेन्शियल इपॅक्ट ऑफ कोविड १९ ऑन द इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालात ‘कोविड १९’ मुळे जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे आहे, असे म्हटले आहे.  पण शेतकरी या वाटेवरून नेहमीच प्रवास करतो. वेळेवर पाऊस येणार कि नाही, पिकं चांगलं येणार कि नाही. पुढे अवकाळी पावसाची भीती, पालेभाज्या असल्या तर सडण्याची भीती. शेतातून पीक निघालाच तर भाव योग्य मिळेल कि नाही. याची चिंता, त्यामुळे जग महामंदीच्या उंबरठ्यावर जरी उभ असलं तरी शेतकरी मात्र या मंदीचा नेहमीच सामना करतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.