रक्षाबंधन : एक अतूट नातं

शिशुपालाचा वध करताना श्रीकृष्णाचे बोट सुदर्शन चक्राने कापले गेले. त्याची वेदना पाहून द्रौपदीने आपली साडी फाडून त्याला मदत केली. त्यावेळी श्रीकृष्णाने नेहमी तुझं रक्षण करेन असं वचन दिले. त्यानंतर महाभारतात ज्यावेळी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले त्यावेळी श्रीकृष्णाने ते वचन पाळले. ही अख्यायिका रक्षाबंधनाची आहे. त्याकाळापासून बहीण-भावाचे नाते जोपसले जाते. राखी बांधून बहीण-भावाला औक्षण करते आणि प्रत्येक भाऊ बहिणीच्या रक्षणास वचनबध्द राहतो.

आज आपण तो सण म्हणून साजरा करू लागलो. काळाच्या ओघात सणांना वेगळे स्वरूप प्राप्त होत चालले आहे. राखी बांधून औक्षण करणं, भेटवस्तू देणं-घेणं चालू लागलं. रक्षाबंधनादिवशी आवर्जून बहीण भावाकडे हट्ट करतात, मग तो छोटा असो वा मोठा. हवी ती वस्तू मागतात. तस ते सारं काही प्रेमापोटी असते. भाऊ ही प्रेमाच्या नात्यांची भेट बहिणीला आनंदाने देतात. राखीच्या या धाग्याने आयुष्यभर ते बांधले जातात.

एकमेकांचं रक्षण करायला बहीण जे इतरांकडे मनमोकळेपणाने बोलत नाही ते भावाजवळ बोलते. एक आधाराचं, मैत्रीचे नाते हे असतं. बरेचदा भांडण होतात पुन्हा एकत्र होतात, ते हे नातं. कोणत्याही अडचणीत एकमेकांना समजून घेणारं आणि आयुष्यात कोणत्याही वळणावर सावरणारं हे नातं भावा-बहिणीचं असतं. रूसवा फुगवा असला तरी तो क्षणिक असतो.

रोजचे दैनंदिन जीवन आपण सुसह्यपणे जगतो ते आपल्या सैनिकांमुळे. ते अहोरात्र आपलं अप्रत्यक्षरित्या-प्रत्यक्षरित्या नेहमी रक्षण करतात. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरसह सांगलीत महापूर आला. त्यानतंर कोल्हापूर-सांगलीत महापुरासारखे मोठे संकट आल्यानंतर एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने युद्धपातळीवर मदत केली. त्यानंतर तेथील महिलांनी जवानांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले. तेथे जे माणुसकीचे दर्शन झाले हेच खरं रक्षाबंधन.

कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण जे रक्षण करतो त्यातून आपलेपणा प्रेम पहावयास मिळाते हे खरे रक्षाबंधन साजरे झाले असे म्हणता येईल. याच रक्षणाची नेहमी जाणीव ठेवली तर समाजात घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी घडणारच नाही आणि प्रत्येकजण उत्तम आयुष्य जगेल. प्रत्येक भावा-बहिणीच्या उत्तम नात्याला सलाम..!

– दीपाली जंगम

Leave A Reply

Your email address will not be published.