राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
कोल्हापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मिणचे व इचलकरंजी येथे छापा टाकून दोन चार चाकी वाहनासह बनावटरित्या तयार केलेल्या विदेशी मद्य जप्त केले आहे. या कारवाईत मद्याचे 20 बॉक्स व दोन मोबाईल असा एकूण 4 लाख 29 हजार 480 रुपयाचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.
या प्रकरणात राहुल रवींद्र शिंदे, (व. २९, रा. इचलकरंजी), अनिस सलीम म्हालदार (व. ३२ रा. सुतार माळ, इचलकरंजी) अरुण शेवाळे (वय ३४५ रा. घोडकेनगर, इचलकरंजी) व रवींद्र शेलार (वय ४१ शेळकेनगर, इचलकरंजी) या चौघाजणांना अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले पेठवडगाव मार्वगावरुन काही इसम हे नॅनो कार (क्रमांक एम एच-०९-बी एक्स-५९३८) मधून बनावट मद्याच्या बॉक्सची वाहतूक करणार असल्याचीमाहिती मिळाली होती. त्या आधारे या मार्गावर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवली होती. बुधवारी सकाळी सव्वा सात वाजता नॅनो कार हातकणंगलेकडून पेठवडगावच्या दिशेने जात असल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांना दिसले. पथकातील अधिकाऱ्यांनी नॅनो कारची तपासणी केली असता, गाडीतील बॉक्समध्ये मॅकडॉल नं.०१, डीएसपी व्हिस्की, बॅगपायपर व्हिस्की या ब्रँडच्या १८० मिलीच्या विदेशी मद्याने भरलेल्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. बाटल्यांची तपासणी केली असता त्यावरील लेबल व बुचे बनावटरित्या तयार केल्याचे दिसून आले.
आगामी नाताळ सण व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आरोग्यास हानीकारक बनावट मद्य तसेच परराज्यातील मद्य अवैद्यरित्या विक्री होण्याची शक्यात असल्याने, नागरिकांनी सतर्क राहून अशा प्रकारची माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाचे कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील व किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी यांनी कारवाई केली.