बारामती (प्रतिनिधी) – दारू समजून विषारी द्रावण पिल्याने तालुक्यातील शिरसने येथील 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
शिरसने(ता. बारामती) येथील दत्तात्रय सोपान वाघमारे यांचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दारु समजून येथील सुमारे सात ते आठजणांनी हे द्रव्य प्राशन केले होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिस प्रशासनाकडे यासंबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
दत्तात्रय वाघमारे हे शिरष्णे येथील महिला सरपंचांचे पती होते. त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते. लॉकडाऊनच्या काळात दारु समजून ते प्राशन केल्याचे समजते. दरम्यान यातील वाघमारे यांचा रविवारी (दि.३) उपचारादरम्यान बारामतीत मृत्यू झाला. अन्य लोकांवर बारामती व फलटणमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.