रानमळावासीयांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

अणे – ऐन पावसाळ्यात रानमळा (ता. जुन्नर) गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून येथील नागरिकांना अतिशय भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रानमळा येथील नळाला गेल्या 15 दिवसांपासून पाणि आले नसून सर्वसामान्य जनता पाण्याअभावी त्रस्त झाली आहे.

गेल्या वर्षी एकही मोठा पाऊस न झाल्याने पाण्याचे सर्व स्त्रोत आटले होते. त्यातच यंदाही अत्यल्प पाऊस झाल्याने तलाव अटले असून नाला बांध, सिमेंट बंधारे व कोरड्याठाक पडलेल्या विहिरी त्यामुळे प्राथमिक शाळा, अंगणवाडी व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना साठवून ठेवलेले पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. ही आहे पाचपाच धरणे ओसंडून वाहात असलेल्या जुन्नर तालुक्‍याची शोकांतिका. दरम्यान, अनेकांनी पिण्यासाठी फिल्टर केलेले पण विश्‍वासार्हता नसलेले जारचे पाणी विकत घ्यावे लागते आहे. जारच्या पाण्याची उपलब्धता व त्याची शुद्धता हा एक संशोधनाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो, त्यामुळे लहानमोठे आजार व पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागल्याने विकतचे पाणि घेऊन विकतचे दुखणेही विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते नागरिक हातपंपाच्या पाण्यावर आपली तहान भागवत असून हातपंपावर महिलांची गर्दी होत आहे.

यंदा रानमळा परिसरात अत्यल्प पाऊस पडला असल्याने तीव्र पाणी टंचाईला सामोरे लागत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश तिकोने यांनी केला. यावेळी शंकर गुंजाळ, दिलीप गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, गंगूबाई गुंजाळ आदी ग्रामस्थ या पाणीटंचाई संदर्भात आपली भूमिका मांडत होते.

आमच्या गावात सुरू असणारे पाण्याचे टॅंकर 5 ऑगस्ट रोजी बंद झाले.टॅंकर सुरू ठेवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला तरीही शासनाने टॅंकर बंद केला.गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून कोरडी पडली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने अवघी 3 ते 4 फूट विहिरीची पाणीपातळी वाढली आहे. भविष्यात पाऊस झाला नाही तर गावाला मोठ्या पाणी संकटाला समोर जावे लागेल अशी परिस्थिती आहे.
– सुरेश तिकोन, सदस्य, रानमळा ग्रामपंचायत

Leave A Reply

Your email address will not be published.