विलास लांडेंना पुरस्कृत उमेदवारी; लांडगेंविरोधात सर्वपक्षीय विरोधकांची खेळी
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघातील विरोधी उमेदवाराच्या “सस्पेन्स’ नाट्यावरचा पडदा अखेर आज उलगडला. भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांनी माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने व माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यासोबत एकानेही राष्ट्रवादीचा “एबी फॉर्म’ जोडला नाही. उमेदवारी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवसापर्यंत भोसरीतून 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. मात्र, महायुतीचा उमेदवार जाहीर झाला तरी आघाडीकडून कोणतीही हलचाल नसल्याने इतर इच्छुकही संभ्रमात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अखेरच्या क्षणापर्यंत विलास लांडे यांची मनधरणी सुरू होती. परंतु, या मागील निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून मिळाले यश आणि लांडगे यांच्या विरोधात सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडे पुरस्कृत म्हणून पाठिंब्यासाठी गळ घातली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा गोंधळ सुरु होता. अखेर विलास लांडे यांच्यासह दत्ता साने, जालिंदर शिंदे यांनी अर्ज सादर केले. मात्र, तिघांपैकी एकाही अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नव्हता. अर्ज भरल्यानंतर भयमुक्त भोसरीचा नारा देत विलास लांडे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आज अखेरच्या दिवशी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आमदार महेश लांडगे यांनी अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आमदार लांडगे यांच्या पत्नी पूजा यांनीही डमी उमेदवारी अर्ज भरला आहे. वंचितकडून शहनवाज शेख, महाराष्ट्र मजदूर पक्षाकडून भाऊ आडागळे, बहुजन समाज पक्षाकडून राजेंद्र पवार, हमारी अपनी पार्टीकडून राजवीर पवार व इतरांनी अर्ज दाखल केले.