केवळ एकाच दिवसात 17 जणांनी भरले अर्ज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. आज दिवसभरात विक्रमी 17 जणांनी अर्ज दाखल केले. तर कालपर्यंत दोनजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे, आता चिंचवड विधानसभेच्या अखाड्यासाठी 18 जणांनी दंड थोपटले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक मतदारसंख्या असलेला व राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या मतदारसंघातून कोण-कोण लढणार याकडे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी प्रारंभ झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास उत्साह दाखवलेला नव्हता.
मंगळवार दि. 1 ऑक्टोंबरपर्यंत केवळ उमेदवारी अर्ज नेण्यासाठी इच्छुक धावपळ करीत असल्याचे चित्र होते. काल दि. 3 ऑक्टोबर रोजी महायुतीकडून लक्ष्मण जगताप यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. त्या अगोदर 30 सप्टेंबर रोजी धर्मपाल तंतरपाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तर शुक्रवारपर्यंत 45 इच्छुकांनी 103 अर्ज नेले होते. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने आता चिंचवडसाठी 19 जणांनी आपले 28 अर्ज दाखल केले आहेत. पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 7 ऑक्टोबर रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
अपक्ष अर्ज दाखल केलेले उमेदवार
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. धर्मपाल तंतरपाळे, सुरज खंडारे, डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले, राजेंद्र मारुती काटे, जावेद रशिद शेख, कैलास दशरथ परदेशी, रवींद्र विनायक पारधे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.