संशयितांच्या तपासणीवर होणार परिणाम; हाफकीनच्या दरामुळे महापालिकेची कोंडी
पुणे – शहरातील लक्षणे असलेल्या तसेच करोना बाधिताच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या संशयितांची महापालिकेकडून रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट केली जाते. मात्र, एका बाजूला हे रुग्ण वाढत असतानाच; दुसऱ्या बाजूला पालिकेकडे अवघे 2 हजार टेस्ट कीट शिल्लक आहेत. त्यामुळे ट्रेसिंगमधून समोर आलेल्या संशयित करोना रुग्णांच्या चाचणीवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान, ही टेस्ट कीट आता केंद्र शासनाच्या हाफकीनकडून घेतली जाणार असून त्यांच्याकडून 57 रुपये प्रति कीट दराने ही कीट दिली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हाफकीनकडे तातडीनं कीट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
महापालिकेस दोन ठेकेदारांकडून या कीटचा पुरवठा केला जातो. सुरुवातीच्या दरात ही कीट पालिकेने साडेचारशे रुपये दराने खरेदी केली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये या कीटची उपलब्धता वाढल्याने हे दर कमी झाले असून ज्या कंपन्यांनी हे कीट या पूर्वी दिले आहेत. त्यांनी पालिकेस आणखी कीट देण्यासाठी 62 ते 63 रुपयांचा दर दिला आहे.
तर केंद्रशासनाच्या अखत्यारीतील हाफकीन ने हे कीट विकसित केले असून त्याची किंमत 57 रुपये आहे. तसेच केंद्र शासनाकडून हाफकिनच्या दरानेच कीट घेण्याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने कीट पुरविण्याऱ्या ठेकेदारांना संपर्क साधून हाफकीनच्या दराने टेस्ट कीट देण्याबाबत विचारणा केली होती. मात्र,या कंपन्यांकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेस हाफकीनकडूनच हे कीट घेण्याशिवाय, पर्याय राहिलेला नाही.
कैद्यांची चाचणीही अडचणीत ?
दरम्यान, महापालिकेकडून ससून रुग्णालयास तातडीच्या बाबींसाठी अॅन्टीजेन टेस्ट कीट देण्यात आली होती. त्यात, येरवडा कारागृहात दाखल करून घेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या ससूनमध्ये अॅन्टीजेन टेस्ट केल्या जातात. मात्र, सोमवारी ससूनमध्ये कीट संपल्याने महापालिकेने तातडीनं हे कीट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, महापालिकेकडून टेस्ट कीट कमी असल्याचे सांगत, काही कीट ससूनला पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, ससूनचे कीट संपल्याने जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ससूनला तातडीनं 5 हजार कीट देण्यात आल्या असल्याने महापालिकेस कीट द्यावी लागली नसल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.