बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून चाहत्यांचा मनावर अधिराज्य करत आहे. तिचा नुकताच “द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट रिलीज झाला.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. याशिवाय ती लवकरच “सायना’च्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. आता आणखी एका चित्रपटात ती झळकणार आहे.
“सनकी’ या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात परिणीती चोप्रा ही अभिनेता वरुण धवन सोबत काम करणार असल्याचे समजते. या चित्रपटातून वरुण-परिणीतीची जोडी पहिल्यांदाच एकत्रित झळकणार आहे. यापूर्वी दोघांनी एकत्रित काम केलेले नसल्याने चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
साजिद नाडियावालाच्या प्रोडक्शनद्वारा निर्मित या चित्रपटात परिणीतीला कास्ट करण्याचा विचार करत आहे. “सनकी’ हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून तो एका चित्रपटाचा रीमेक आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, साजिदच्या “ढिशूम’मध्ये वरुण आणि परिणती यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका गाण्यात वरुण आणि परिणीती एकत्रित झळकले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास परिणीती लवकरच “ऍनिमल’ चित्रपटात झळकणार आहे.