नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर आज या पदाधिकाऱ्यांनी चितळे रोड येथील शिवालयाला भेट देत स्व. अनिल राठोड यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत कामकाजाला सुरुवात केली.
नगरमध्ये शिवसेनेत फूट पडली असून काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर केली. विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी चितळे रोड येथील शिवालयाला भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सचिन जाधव, उपजिल्हाप्रमुख सुभाष लोंढे, काका शेळके उपस्थित होते. उत्तर जिल्हाप्रमुखाचीही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. हे नाव सर्वपरिचित असून ते सध्या आम्ही उघड करणार नाही, असे अनिल शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीत नगरसेवक यांची जिल्हाप्रमुखपदी (दक्षिण) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाप्रमुखपदी सुभाष लोंढे, महानगर प्रमुखपदी माजी नगरसेवक दिलीप सातपुते, भिंगार शहरप्रमुखपदी सुनील लालबोंद्रे, जिल्हा संपर्कप्रमुखपदी माजी नगरसेवक सचिन जाधव, श्रीगोंदा तालुकाप्रमुखपदी नंदकुमार ताडे यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
भाजप-सेनेचा भगवा
आगामी मनपा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांची युती होणार असून मनपा निवडणुकीत युतीचा भगवा फडकणार आहे, असे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुकीतही विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.