प्रभात वृत्तसेवा पुणे, दि.24 – गणेशोत्सवाची सुरुवात दि.31 ऑगस्टपासून होत आहे. राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ऑगस्टचे वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावे, अशा सूचना वित्त विभागाने शासनाच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.
ऑगस्ट 2022 महिन्याचे वेतन सप्टेंबरमध्ये होते. मात्र, गणेशोत्सव सण येत असल्याने सणाच्या आधी सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वेतन दि.29 ऑगस्टपूर्वी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, शासनाचे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा तसेच निवृत्तीवेतनधारकांना सणाच्या पूर्वी पगार मिळणार आहे. याबाबतचा निर्णय वित्त उपसचिव इंद्रजित मोरे यांनी जारी केला आहे.