हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न
राजगुरूनगर – देश स्वातंत्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्या क्रांतिकारकांना विसरू नका. माझे काही नाही, आहे ते या देशाचे आहे, अशी भावना आपल्यात रुजली पाहिजे. तसेच राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हुतात्मा राजगुरू यांच्या 114 वी जयंतीनिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड तालुका यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, आपल्या देशात देशभक्तीचा जागर व्हायला पाहिजे. देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या महान हुतात्मांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे, त्यांना तो शिकवला पाहिजे. हुतात्मा झालेल्या महापुरुषांची केवळ जयंती साजरी करून चालणार नाही तर देश पुढे कसा जाईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. राष्ट्रभाव आपण जागृत ठेवला पाहिजे. क्रांतिकारकांचे स्मरण करा ते आपले कर्तव्य आहे. नवीन पिढीला राष्ट्रप्रेम शिकवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू, हुतात्मा भगतसिंह यांचे वंशज किरणजित सिंह, हुतात्मा सुखदेव यांचे वंशज अनुज थापर, हुतात्मा विष्णू पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे, हुतात्मा बाबू गेणू यांचे वंशज किसन सैद यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी तर मधुकर गिलबिले यांनी आभार मानले.
…म्हणून स्मारकाचे काम करता येत नाही
हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकासाठी आमदार असताना मोठा निधी दिला. स्मारकातील हुतात्मा राजगुरू यांची जन्म खोली, वाड्याला संरक्षक भिंत बांधली, जुनी वास्तू केली आहे तशी बांधली; मात्र पुढील विकासाला अडसर आला. स्मारकाजवळ नागरिकांचे पुनर्वसन होत नसल्याने स्मारकाचे काम करता येत नाही, असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
हुतात्मा राजगुरू यांचा त्याग, बलिदान देशासाठी प्रेरणा आहे. हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाचा विकास आराखडा तयार आहे, अपेक्षित निधीची तरतूद करून जन्मस्थळ वाड्याचे काम तडीस न्यावे. हे काम लवकर झाल्यास नवीन पिढीला इतिहास समजणे सोपे जाईल.
– सत्यशील राजगुरू, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज