मल्हारपेठ (प्रतिनिधी) – बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही नाडे नवारस्ता, ता. पाटण येथील पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंपावर कर्मचारी अवैधरित्या प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पेट्रोलपंप कर्मचार्यांंवर गुन्हा दाखल झाला आहे. कर्मचारी विकास जयवंत चव्हाण रा. गमेवाडी, ता. कराड व शाखाप्रमुख नारायण लक्ष्मण जाधव रा. गव्हानवाडी, ता. पाटण अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पेट्रोल पंप मालक-चालक आणि प्रांताधिकारी यांच्या समेवत झालेल्या बैठकीत शासकीय नियमांचे पालन करून पेट्रोल विक्री करावी.
कोणालाही बाटली अथवा कॅनमधून पेट्रोल देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी रात्री पाटण तालुका खरेदी-विक्री संघाच्या म्हावशी व नाडे नवारस्ता येथील पेट्रोल पंपांना पुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी अचानक भेटी दिल्या. त्यावेळी नाडे-नवारस्ता येथील पंपावर कर्मचारी कॅन व प्लास्टिक बाटलीतून पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पेट्रोल घेणारे ग्राहक पळून गेले.
मात्र, याबाबत विचारणा केली असता कर्मचारी समाधानकारक उत्तर देता आले नाही. याप्रकरणी पाटण येथील पुरवठा शाखेचे उपलेखापाल महादेव अष्टेकर यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक फौजदार संतोष कोळी करीत आहेत.