मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. परदेशातील राजकीय नेते भारतातील राजकीय नेत्यांबाबात अशा पद्धतीचे मत जाहीर करु शकत नाही असे संजय राऊत यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.
शिवसेना नाराज झाल्याने बराक ओबामांना झोप लागत नसेल असा टोला निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. “शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामांना झोप लागत नसेल. आता ओबामांचं कसं होणार या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामांचं आता काही खरं नाही,” असं उपहासात्मक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
बराक ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ पुस्तकात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि कमी योग्यतेचे नेते असल्याचं ओबामा यांनी म्हटलं आहे. “परदेशातील राजकारणी भारतातील राजकीय नेत्यांबद्दल अशी मते व्यक्त करु शकत नाहीत. ‘ट्रम्प वेडे आहेत’ असे आपण म्हणत नाही. बराक ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.