आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्र होणार विकसित
लंडन : पाळीव प्राणी असोत किंवा जंगली प्राणी असोत मानवाला त्यांच्याविषयी नेहमीच कुतूहल आणि आकर्षण असते पण हे सर्व प्राणी मुके असल्याने मानवाला त्यांच्याशी संवाद साधता येत नाहीत आणि त्यांच्या भावना जाणून घेता येत नाही. पण आता लवकरच माणसाला प्राण्यांची भाषा समजणार आहे.
आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आता प्राण्यांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियातील प्रोफेसर कारन बेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जर्मनीतील काही संशोधकांनी काही प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड केले असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या साह्याने या आवाजाचे डीकोडींग करायला सुरुवात केली आहे. म्हणजेच प्राण्यांचे जे आवाज आहे त्याचा निश्चित अर्थ काय याबाबत विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
या प्रयोगामध्ये प्रारंभी मधमाशांचा आवाज आणि हत्तीचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला असून मधमाशा आणि हत्तींना कोणता संवाद साधायचा होता याबाबत शोध सुरू करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच यंत्रमानवाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता प्राण्यांची भाषा अशाप्रकारे समजणे शक्य होणार असले तरी त्यातील धोकाही संशोधकांनी समोर आणला आहे.
एकदा का माणसाला प्राण्यांची भाषा समजली तर प्राण्यांवर नियंत्रण ठेवणे माणसाला सोपे जाणार आहे आणि आपल्या फायद्यासाठी प्राण्याचा कसाही वापर करण्याचे दुष्कर्म सुद्धा एखादी दुष्ट व्यक्ती करू शकते. प्राणी अतिशय नैसर्गिक पद्धतीने जीवन जगत असतात पण त्यांची भाषा एकदा माणसाला अवगत झाली की त्यांच्या नैसर्गिक जीवन पद्धतीवर सुद्धा माणसाचे नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे निसर्गाचे सगळे नियमच बदलून जातील हा धोकाही तज्ञांनी लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे आगामी कालावधीमध्ये जरी बुद्धिमत्तेचा वापर करून कोणत्याही प्राण्याची भाषा माणसाला अवगत झाली तरी त्या तंत्रज्ञानाचा वापर जपूनच करायला हवा असा इशारा संशोधकांनी दिला आहे.