पिंपरी – आगामी लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविजय-2024 अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, असा निर्धार केला आहे. मात्र, युतीमध्ये हा मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी मावळ लोकसभेसाठी उमेदवाराबाबत निर्णय युतीतील पक्ष घेतील. पक्ष सांगेल त्याचे आम्ही काम करणार असल्याचे सांगत आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी सोमवारी (दि.9) स्पष्ट केले.
मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या (दि.11) दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष जगताप बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळुराम बारणे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अनुप मोरे, अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष जगताप म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे बुधवारी सायंकाळी 4 वाजता किवळे-मुकाई चौक येथे आगमन होऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांतील भाजपा वॉरियर्स शी संवाद साधणार आहेत. यानंतर घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या 9 वर्षातील लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
महिला नेत्याने पदाधिकाऱ्याला झापले
मावळ लोकसभा प्रवास दौऱ्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात येणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी शहर भाजपच्या वतीने मोरवाडी येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर एका महिला नेत्याने पदाधिकाऱ्याला चांगलेच झापल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.