पुणे – जमिनीचा मालकी हक्क गृहसंस्थेला प्रदान करणारी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया शासनाने सोपी केली आहे. मात्र, शहरातील अजूनही नऊ हजारांपेक्षा अधिक गृहनिर्माण संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या संस्था जमिनीच्या मालकी हक्कापासून दूर राहिल्या आहेत.
बांधकाम व्यावसायिकाने सदनिकेच्या विक्रीनंतर गृहनिर्माण संस्थेच्या नावे जमिनीची मालकी हस्तांतरित करणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा तसे होत नाही. त्यामुळे गृहसंस्थेतील सभासदांच्या मालकीची सदनिका झाली, तरी ज्या जमिनीवर संस्थेची उभारणी झाली ती जमीन विकासकाच्याच नावे राहते. त्यामुळे सदनिकेची पुनर्विक्री करताना बांधकाम व्यावसायिकांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची वेळ येते.
संबंधित जमिनीवर विकसकाच्या संमतीशिवाय सभासदांना काहीच करता येत नाही. उलट विकासकच मोबाइल टॉवर, विविध होर्डिंग लावून त्याचा मलिदा लाटतात. संस्थेची पुनर्बांधणी करायची असेल, तरीही विकसकाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. शहरात सुमारे 19 हजार गृहनिर्माण संस्था आहे. यातील 10 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण झाले आहे. संस्थांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी जागृती करण्यात येते. तसेच डीम्ड कनव्हेन्ससाठी आवश्यक 12 कागदपत्रांची संख्या कमी करून ती आठवर आणली आहे.
भविष्यात येतात अनेक अडचणी
बांधकाम व्यावसायिकांकडून मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया करण्यात येत नसल्याने सहकार विभागाकडून मानीव अभिहस्तांतरण करून देण्यात येते. सोसायटीचे हस्तांतर न झाल्यास भविष्यात सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल, तर चटई क्षेत्र निर्देशांक ( एफएसआय) वाढवून घ्यायचा असेल, तर अडचणी येतात. त्यामुळे संबंधित जागेची मालकी हक्क असलेला पुरावा म्हणजे सात-बारा उतारा अथवा प्रॉपर्टी कार्डवर यावर गृहनिर्माण संस्थेचे नाव असणे आवश्यक आहे. अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतात.
मानीव अभिहस्तांतरणाचे टप्पे
- संबधित जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे नमुना-7 मध्ये आवश्यक कागदपत्रांसह डीम्ड कनव्हेयन्सच्या मसुदा दस्तासहीत अर्ज करणे. तसेच डीम्ड कनव्हेन्सचा आदेश व प्रमाणपत्र दस्तासहित प्राप्त करून घेणे.
- मसुदा दस्त सर्व सदनिकाधारकांच्या मुद्रांक शुल्काच्या तपशीलासह मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनिर्णय करून घेणे.
- सदर दस्त संबंधित कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करून घेणे.
- नोंदणीकृत दस्तनुसार संबंधित नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे अथवा मंडल अधिकारी यांच्याकडे सात-बारा उताऱ्यावर नोंदणीसाठी अर्ज करणे. त्यानंतर संबधित अधिकारी यांनी प्रॉपर्टी कार्ड अथवा सात-बारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून संस्थेचे नाव नोंदवल्यानंतर मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
“डीम्ड कन्व्हेयन्ससाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी महासंघदेखील सोसायट्यांत जागृती करत आहे. सहकारी संस्थांनी उदासीनता सोडून संधीचा लाभ घ्यावा. ही प्रकरणे तातडीने मार्गी लागण्यासाठी सहकार आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.”- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ