पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शेवटची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी सातव्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया होत आहे.
बुधवार (दि.11) पासून या फेरीला सुरुवात होणार आहे. सर्व उत्तीर्ण, प्रतिबंधित झालेल्या व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येणार आहे. अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित व सहा विशेष फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यात आणखी 39 हजार 690 जागांवरील प्रवेश अद्यापही रिक्तच आहेत, असे प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
- दि. 11 ते 13 ऑक्टोबर- नव्याने प्रवेश अर्ज 1 व 2 भरणे, अर्ज प्रमाणित करणे.
- दि. 13- प्रवेश अर्जाच्या भाग-2 मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक करणे.
- दि. 14 व 15- डेटा प्रोसेसिंग होणार, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार होणार.
- दि. 16- गुणवत्ता यादी जाहीर होणार, फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दर्शविणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे.
- दि. 16 व 17 – विद्यार्थ्यांनी प्रवेश जाहीर झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करणे, कोटा व द्विलक्षी प्रवेश घेता येणार.
- दि. 17- प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर दर्शविण्यात येणार.