पक्षावर नाही तर फडणवीस टीमवर नाराज : खडसे

तीन विचारांचे खिचडी सरकार टिकणार नाही

सोनई – भाजप पक्षावर नाराज नाही पण पक्षातील फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. योग्य वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार आहे. त्याच संधीची वाट पाहत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

आज दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात महापूजा करून शनिला अभिषेक घातला. त्यानंतर त्यांनी चौथऱ्यावर जाऊन शनि दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर उपस्थित होते.

खडसे म्हणाले, माझे पक्ष उभारणीत मोठे योगदान आहे. तसेच मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षापासून माझ्यावर अन्याय होत आहे. पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी, योग्य ठिकाणी अधिक सविस्तर बोलणार आहे, त्या संधीची मी वाट पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत भाजप सेना युतीला जनतेने कौल दिला, परंतु सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षाकडुन चुका झाल्यामुळे सरकार स्थापन करता आले नाही. या सरकारला जनादेश नसून हे सरकार फार काळ टीकणार नाही. तीन विचारांचे खिचडी सरकार आहे. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही. असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.