-->

शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत कोणीही बोलेना

अनेकांना संभ्रम : विधान परिषद आमदारांचे शिक्षण सचिवांना पत्र

पुणे – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालेला आहे. यामुळे शैक्षणिक परिस्थितीही बदल होणार असून या बदलाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना योग्य मार्गदर्शक करण्याची गरज निर्माण झालेली आहे. याबाबत विधान परिषदेच्या आमदारांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्रही पाठविले आहे.

करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत.

दहावीच्या परीक्षा झालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका कस्टडीमध्ये पडून आहेत. या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना कधी वितरित करण्यात येणार? इयत्ता दहावीची एनटीएसईची पूर्व परीक्षा होऊन निकाल जाहीर झालेला नाही व मुख्य परीक्षा 10 मे रोजी घेण्यात येणार आहे. ही मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी व संभाव्य तारीख जाहीर करण्याची गरज आहे.

शैक्षणिक विभागातील सर्व कामे ठप्प झाली असून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या संभ्रम दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी मागणी आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील, किशोर दराडे यांनी केली आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द आणि इयत्ता नववी आणि अकरावीच्या सर्व विषयांच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या प्रश्‍नांवर तोडगा निघाला आहे. पण, अन्य प्रश्‍न कायम असून, त्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.