न्हावरे(प्रतिनिधी) :- न्हावरे (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर बेकायदा गावठी दारु बाळगल्या प्रकरणी गावठी दारू विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. न्हावरे पोलिसांनी कारवाईत सचिन अशोक पवार (रा.न्हावरे, ता.शिरुर, जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
यासंदर्भात न्हावरे दुरक्षेत्र पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन अशोक पवार हा न्हावरे गावठाणात ग्रामपंचायत कार्यालयापासून जवळच अनेक दिवसांपासून बेकायदेशीर गावठी दारू विक्री करत होता.याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीने व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी करोना महामारीच्या धर्तीवर गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी.अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्याकडे केली होती.
त्यानुसार काल (दि.३१) संध्याकाळी पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रल्हाद जगताप , पोलीस हवालदार बाळासाहेब खोमणे, प्रविण राऊत या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून न्हावरे गावठाण परिसरात सचिन पवार याला ताब्यात घेतले असता, त्यांच्या दुचाकीच्या डीकीमध्ये पाच लिटर दारु पोलिसांना आढळून आली.
दरम्यान, पोलिसांनी सचिन पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील पाच लिटर दारू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रल्हाद जगताप करत आहेत.