नवी दिल्ली – एका घरात चोरीच्या उद्देशाने चोर घुसला, पण त्या घरात चोरी करण्यासारखे काहीही न सापडल्याने चोराने दयाबुद्धीने त्या घरमालकाला मदत म्हणून तिथे पाचशे रूपयाची नोट ठेवून तेथून तो फरारी झाल्याची घटना नवी दिल्लीच्या रोहिणी येथील सेक्टर 8 मध्ये घडली असे पोलिसांनी सांगितले.
20-21 जुलैच्या मध्यरात्री घडलेली ही विचित्र घटना घडल्याची माहिती घरमालकाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. हे घर 80 वर्षीय सेवानिवृत्त अभियंता एम रामकृष्ण यांचे आहे. त्यांनी म्हटले आहे की, 19 जुलै रोजी संध्याकाळी ते त्यांच्या पत्नीसह गुरुग्राममध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलाला भेटायला गेले होते.21 जुलै रोजी सकाळी त्यांना त्याच्या शेजाऱ्याचा फोन आला, त्यांनी त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली.
माहिती मिळताच, ते ताबडतोब घरी गेले. तिथे त्यांना मुख्य गेटचे कुलूप तुटलेले दिसले. तेथे काहीही चोरीला गेलेले नाही परंतु त्याला मुख्य गेटजवळ 500 रुपयांची नोट ठेवलेली आढळली. हा सारा प्रकार त्यांनी पोलिसांना कळवला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या चोरीच्या प्रयत्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुढील तपास सुरू आहे.